मोठ्यांच्या तुलनेत मुलांच्यात हा प्रश्न अधिक महत्वाचा का आहे?
- मुलांना वारंवार ताप येण्याचे महत्त्वाचे कारण किडणी व मूत्रमार्गाचा संसर्ग हे असू शकते.
- कमी वयाच्या मुलांमध्ये किडणी किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग झालाय हे उशिरा लक्षात येते आणि त्यावर पूर्ण उपचार न केल्यास किडणीचे कायमचे नुकसान होऊ शकते. कित्येक वेळा किडणी पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते.
- ह्यामुळेच मुलांच्यात लघवीच्या संसर्गाचे त्वरित निदान व त्यावर उपचार केल्यास किडणीचे संभाव्य नुकसान टळते.
मुलांमध्ये लघवीच्या संसर्गाची जास्त शक्यता केव्हा असते?
मुलांमध्ये लघवी संसर्ग होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- मुलींमध्ये मूत्रनलिकेची लांबी कमी असल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. याबरोबर मूत्रनलिका व गुदद्वार जवळ असल्यामुळे, मलमार्गातील जीवाणू मूत्रनलिकेत सहज जातात व संसर्ग होतो.
- मलत्याग केल्यानंतर ती जागा स्वच्छ करण्याची क्रिया मागून पुढे अशी करण्याची सवय.
- जन्मतःच मूत्राशयातून लघवी उलटीकडे मूत्रवाहिनी किंवा किडणीकडे जाणे (Vesico Ureteric Reflux).
- किडणीच्या आतल्या बाजूला आणि मध्यभागातून खाली जाणाऱ्या भागाला-पेल्वीस व मूत्रवाहिनीला जोडणाऱ्या भागाचे आकुंचन होऊन लघवीच्या मार्गात अडथळा येणे (Pelvi Uretic Junction / PUJ ob-struction).
- मूत्रनलिकेत व्हॉल्व (Posterior Urethral valve) असल्यामुळे कमी वयाच्या मुलांना लघवी करताना त्रास होणे.
- मूत्रमार्गात मुतखडा होणे.
मुलांमध्ये वारंवार येणाऱ्या तापाचे कारण मूत्रमार्गाचा संसर्ग हे असू शकते.
लघवीतील संसर्गाची लक्षणे:
- साधारणतः चार/पाच वर्षाची मुले लघवीच्या त्रासाची तक्रार स्वतः करू शकतात. लघवीच्या संसर्गाबद्दलची विस्तृत चर्चा प्रकरण १९ मध्ये केली आहे.
- अगदी लहान वयाची मुले लघवीच्या त्रासाची तक्रार स्वतः करू शकत नाहीत. लघवी करताना मूल रडत असेल, लघवी होताना त्रास होत असेल किंवा ताप असताना केलेल्या लघवीच्या तपासणीत अचानक संसर्ग असल्याचे आढळून आले तर ती मूत्रमार्गाच्या संसर्गाची चिन्हे आहेत.
- भूक न लागणे, वजन वाढणे किंवा गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाल्यास जास्त तापाबरोबर पोट फुगणे, उलटी होणे, जुलाब होणे, कावीळहोणे अशी लक्षणेसुद्धा मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे, कमी वयाच्या मुलांमध्ये आढळून येतात.
मूत्रमार्गाच्या संसर्गाचे निदान:
किडणी व मूत्रमार्गाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आवश्यक तपासणीचे दोन भागात विभाजन करता येईल:
- मूत्रमार्गाच्या संसर्गाचे निदान
- मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कारणांचे निदान
मुलांमध्ये होणाऱ्या मूत्रमार्गाच्या संसर्गाची प्रमुख लक्षणे ताप, वजन वाढणे, लघवीचा त्रास इ. आहेत.
१) मूत्रमार्गाच्या संसर्गाचे निदान:
लघवीच्या सामान्य व कल्चर ह्या तपासणीत पू आढळणे, मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण आहे. ही तपासणी संसर्गाच्या निदान व उपचारासाठी खूप महत्त्वाची आहे.
२) मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कारणांचे निदान:
इतर आवश्यक तपासणी करून किडणी आणि मूत्रमार्गातील दोष, लघवीच्या मार्गातील अडथळे आणि लघवी करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी वगैरे समस्यांचे निदान होऊ शकते. ह्या समस्या मूत्रमार्गात वारंवार संसर्ग होण्याला जबाबदार असतात. या समस्यांवर निदानासाठी आवश्यक तपासण्या कोणत्या, या संदर्भात आपण यापूर्वीच प्रकरण क्र. ४ आणि क्र. १९ मध्ये चर्चा केली आहे.
बहुतेक मुलांमध्ये लघवीतील संसर्गाच्या कारणांचे निदान करण्यासाठी आवश्यक एम सी यू (MCU) तपासणी कशी केली जाते? ती का महत्त्वाची आहे?
मिक्चुरेटिंग सिस्टोयुरेथ्रोग्राम - MCU म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या तपासणीत विशेष प्रकारचे आयोडिनयुक्त द्रव कॅथेटर (नळी) द्वारे मूत्राशयात भरले जाते. मग मुलाला लघवी करण्यास सांगितले जाते. लघवी करताना मूत्राशय व मूत्रनलिका यांचे एक्सरे घेतले जातात. या तपासणीमुळे लघवी मूत्राशयातून उलट्या दिशेने मूत्रवाहिनीत जात असेल, मूत्राशयात काही कमतरता असेल किंवा मूत्राशयातून लघवी बाहेर पडण्याच्या मार्गात काही अडथळा असेल तर त्याबद्दलची माहिती मिळते.
मूत्रमार्गातील संसर्गाच्या कारणांच्या निदानासाठी सोनोग्राफी, एक्सरे, एम.सी.यू आणि आय.वी.पी. या तपासण्या केल्या जातात.
इन्ट्राव्हीनस पायलोग्राफी (IVP) कधी व कशासाठी केली जाते?
३ वर्षावरील मुलांमध्ये जेव्हा जेव्हा लघवीत संसर्ग होतो, तेव्हा पोटाचा एक्सरे, सोनोग्राफी ह्या तपासणीनंतर आवश्यक असल्यास वरील तपासणी केली जाते. या तपासणीमुळे संसर्गासाठी जबाबदार, जन्मतःच असलेली कमतरता किंवा मूत्रमार्गातील अडथळा या संबंधी माहिती मिळू शकते.
मूत्रमार्गातील संसर्गावरील उपचार:
सर्व साधारण दक्षता:
- मुलांना दिवसा जास्तीत जास्त वेळा व रात्री २ ते ३ वेळा पाणी दिले पाहिजे.
- नियमित मलमूत्र विसर्जनाची सवय लावली पाहिजे.
- शौचाची, लघवीची व आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवण्याची सवय लावली पाहिजे.
- शौचानंतर ती जागा जास्त पाणी घेऊन, पुढून मागच्या बाजूला धुतल्यास संसर्गाची शक्यता कमी होते.
- मुलांना सामान्य आहार घ्यायची सूट दिली जाते.
- मुलामध्ये ताप असल्यास ताप कमी होण्याचे औषध दिले जाते.
- संसर्गावर उपचार पूर्ण झाल्यावर, लघवीची तपासणी करून संसर्ग पूर्णपणे बरा झाल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
- लघवीतील संसर्ग पुन्हा झाला नाही हे जाणून घेण्यासाठी, उपचार पूर्ण झाल्यानंतर सात दिवसांनी आणि नंतरही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वारंवार तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
लघवीची तपासणी मूत्रमार्गाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी व उपचारांच्या नियमनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
औषधाद्वारे उपचार:
- लघवीच्या संसर्गाच्या निदानानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलांच्यात संसर्गाची लक्षणे, त्याचे गांभीर्य व त्यांचे वय लक्षात घेऊन अँन्टीबायोटिक्स दिली जातात.
- उपचार सुरू करण्यापूर्वी लघवीची कल्चर व सेन्सेटिव्हिटी तपासणी करणे आवश्यक आहे. या रिपोर्टच्या आधारे डॉक्टर सर्वश्रेष्ठ औषध निवडून संसर्गावर परिणाम कारक उपचार करू शकतात.
- कमी वयाच्या मुलांमध्ये संसर्ग गंभीर स्वरूपाचा असेल, तर अँटीबायोटिक्स ची इंजेक्शने देणे आवश्यक असते.
- साधारणतः वापरण्यात येणाऱ्या अँटीबायोटिक्समध्ये अमोक्सिसिलिन, अमीनोग्लाइकोसाइड, सीफेलोस्पोरिन, कॉड्राइमेक्सेझॉल, नायट्रोफ्युरेन्टाईन वगैरेंचा समावेश असतो.
- या प्रकारचा उपचार साधारणतः ५ ते १० दिवसांपर्यंत केला जातो. संसर्गाबरोबरच, संसर्ग होण्याच्या कारणांप्रमाणे पुढील उपचारांबद्दल निर्णय घेतला जातो.
मूत्रमार्गात वारंवार होणाऱ्या संसर्गावरील उपचार:
औषधाद्वारे उपचार:
- ज्या रुग्णाला वर्षभरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा संसर्ग झाला असेल, अशा रुग्णाला विशेष प्रकारची औषधे; कमी प्रमाणात; रात्री एक वेळा, ३ महिन्यांपर्यंत घेण्याचा सल्ला दिला जातो.
- किती काळापर्यंत हे औषध घ्यायचे हे रुग्णाला होणारा त्रास, संसर्गाचे प्रमाण, संसर्गाची कारणे इत्यादी बाबी लक्षात घेऊन डॉक्टर निश्चित करतात.
- खूप काळापर्यंत, कमी प्रमाणात औषध घेण्यात, लघवीतीत संसर्ग वारंवार होण्यापासून टाळता येते व या औषधाचा काही विपरीत परिणामही होत नाही.
लघवीची कल्चर तपासणी मूत्रमार्गाच्या संसर्गावरील अँटीबायोटिक्स निवडताना महत्त्वपूर्ण असते.
मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कारणांवर विशिष्ट उपचार:
ह्या रोगावर विशिष्ट उपचार किडणी फिजीशियन, नेफ्रोलॉजिस्ट - किडणी सर्जन, युरोलॉजिस्ट किंवा मुलांचे तज्ञ ठरवतात.
१) पेल्वी युरेटिरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन (PUJ Obstruction) म्हणजे काय? या जन्मतःच्या असलेल्या कमतरतेत काय होते?
या जन्मजात असलेल्या कमतरतेत किडणीचा भाग (जो किडणीच्या आतल्या बाजूच्या मध्यभागात असतो व किडणीत तयार झालेल्या मूत्राला, खाली मूत्रवाहिनीत पाठवतो.) आणि मूत्रवाहिनीला जोडणारी जागा आंकुचित पावल्यामुळे लघवीच्या मार्गात अडथळा येतो. या अडथळ्यामुळे किडणी सुजते आणि रुग्णांना वारंवार लघवीचा संसर्ग होतो. जर योग्य वेळी योग्य उपचार केले गेले नाही, तर बराच काळ (वर्ष) सुजलेली किडणी हळूहळू कमजोर होऊन निकामी होऊ शकते.
उपचार:
जन्मतः असलेल्या ह्या व्यंगावर औषध नाही. ह्या व्यंगावर विशिष्ट उपचारामध्ये 'पायलोप्लास्टी' ऑपरेशन करून लघवीच्या मार्गातील अडथळा दूर केला जातो.
मुलांच्या मूत्रमार्गाच्या संसर्गावर योग्य उपचार न झाल्यास किडणीचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
२) मूत्रनलिकेतील झडप (Posterior Urethral Valve):
या जन्मजात व्यंगामुळे काय होते?
मुलांच्यात आढळणाऱ्या या समस्येमध्ये मूत्रनलिकेत जन्मजात निर्माण झालेल्या झडपेमुळे मूत्रमार्गात अडथळा येतो व लघवी करताना त्रास होतो. लघवी करताना जोर करावा लागतो, लघवीची धार पातळ असते व थेंब थेंब लघवी होते. जन्मल्यावर पहिल्याच महिन्यात किंवा कधी कधी गर्भावस्थेतील शेवटच्या महिन्यात करण्यात येणाऱ्या सोनोग्राफीत या रोगाची लक्षणे पाहायला मिळतात.
लघवीच्या मार्गात अधिक अडथळा आल्यामुळे मूत्राशयाची भित मोठी होते व मूत्राशयाचा आकार मोठा होतो. मूत्राशयातून पुरेशा प्रमाणात लघवी बाहेर पडत नसल्यामुळे लघवी मूत्राशयातच राहते. अधिक प्रमाणात लघवी साठल्यामुळे मूत्राशयावरील दाब वाढत जातो, ज्यामुळे मूत्रवाहिनी व किडणीही फुगून प्रसरण पावतात. या परिस्थितीत योग्य उपचार केले नाहीत तर हळूहळू गंभीर नुकसान होऊ शकते.
उपचार:
अशा प्रकारची समस्या मूत्रनलिकेतील जन्मजात निर्माण झालेली झडप ऑपरेशन करून दूर केली जाते. काही मुलांमध्ये जांघेच्या भागात चीर पाडून, मूत्राशयातून लघवी सरळ बाहेर काढून अशा प्रकार ची शस्त्रक्रिया केली जाते.
३) मुतखडा (Urinary stone):
छोट्या मुलांमध्ये आढळणाऱ्या मुतखड्यांवरील उपचारांमध्ये मुतखड्याचे स्थान, आकार, प्रकार वगैरे सगळ्या बाबींचा विचार करून, आवश्यक असल्यास दुर्बिणीची मदत घेऊन शस्त्रक्रियेद्वारे किंवा लिथोट्रिप्सीद्वारे उपचार केले जातात.
अशा प्रकारे मुतखडा काढून टाकल्यावर प्रयोगशाळेत त्याचे परीक्षण करून पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून औषध व आवश्यक सल्ला दिला जातो.
मुलांच्यात जन्मजात असणाऱ्या व्यंगामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते.
४) व्ही. यू. आर. (Vesico-Ureteric Reflux):
मुलांच्यात लघवीच्या संसर्गाच्या सर्व कारणांमध्ये सर्वात मुख्य व महत्त्वाचे कारण म्हणजे वसायको युरेटेरिक रिफ्लक्स (VUR - Vesicoureteral Reflux). व्ही.यू.आर.मध्ये जन्मजात व्यंगामुळे लघवी मूत्राशयातून उलट्या बाजूला, मूत्रवाहिनी व किडणीकडे जाते.
व्ही. यू. आर.वर चर्चा का महत्त्वाची आहे?
मुलांच्यात लघवीचा संसर्ग, उच्च रक्तदाब आणि क्रॉनिक किडणी फेल्युअर होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण व्हीयूआर आहे.
व्ही. यू. आर.मध्ये काय होते?
साधारणपणे मूत्राशयावर जास्त दबाव आल्यावरही, मूत्रवाहिनी व मूत्राशयामधली झडप लघवीला मूत्रवाहिनीकडे जाण्यापासून अडवते आणि लघवी करताना मूत्र मूत्राशयातून एकाच दिशेने मूत्रनलिकेतून बाहेर पडते. परंतु व्ही. यू. आर. मध्ये या झडपेच्या रचनेत व्यंग असल्यामुळे जेव्हा मूत्राशयात जास्त लघवी जमा होते. तेव्हा लघवी करताना ती उलट्या दिशेने, मूत्राशयातून एका किंवा दोन्ही मूत्रवाहिन्यांकडे जाते.
मुलांच्यात मूत्रमार्गाच्या संसर्गाचे आणि क्रॉनिक किडणी फेल्युअरचे मुख्य कारण व्ही. यू. आर. हे जन्मजात व्यंग आहे.

व्ही. आर. यू. मध्ये कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो?
या रोगात होणारा त्रास रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. तीव्रता कमी असलेल्या रोगात उलट्या बाजूने जाणाऱ्या लघवीचे प्रमाण कमी असते आणि लघवी फक्त मूत्रवाहिनी आणि किडणीच्या काही भागापर्यंतच जाते. अशा प्रकारचा रोग झालेल्या मुलांना लघवीत वारंवार संसर्ग होण्याखेरीज इतर कोणतीही समस्या साधारणपणे जाणवत नाही.
रोगाचे प्रमाण जेव्हा तीव्र असते तेव्हा मात्र, जास्त प्रमाणात लघवी उलट्या दिशेने जात असल्याने किडणी फुगते आणि लघवीच्या दाबामुळे दीर्घकाळानंतर हळूहळ किडणीचे नुकसान होते. ह्या समस्येवर योग्य वेळी योग्य उपचार झाले नाही, तर किडणी पूर्णपणे खराब होऊ शकते.
खास एक्रे तपासणी एम. सी. यू. द्वारे व्ही. यू. आर.चे निदान होते.
व्ही. यू. आर. वरील उपचार:
ह्या रोगावरील उपचार, रोगाची लक्षणे, त्यांचे प्रमाण आणि मुलांचे वय लक्षात घेऊन निश्चित केले जातात.
- लघवीतील संसर्गाचे नियंत्रण रोग्यावरील उपचारांचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी अँटीबायोटिक्स देणे आवश्यक असते. रोग्यासाठी कोणते अँटीबायोटिक्स जास्त परिणामकारक राहील हे ठरवण्यासाठी लघवीच्या कल्चर तपासणीची मदत होते.
- औषधे घेतल्यानंतर संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, त्या मुलात पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी, कमी प्रमाणात, दररोज एकदा रात्री झोपताना, दोन ते तीन वर्षांपर्यंत अँटीबायोटिक द्यावेच लागतात. उपचार चालू असताना दर महिन्याला किंवा गरज पडली तर त्यापूर्वीही लघवीच्या तपासणीच्या मदतीने, संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे का, हे निश्चित केले जाते आणि त्यानुसार औषधात फेरबदल केले जातात.
- जेव्हा रोग कमी तीव्रतेचा असतो, तेव्हा साधारणपणे १ ते ३ वर्षांपर्यंत, अशाच प्रकारे औषधोपचार केले तर हा रोग ऑपरेशनशिवाय हळूहळू पूर्णपणे बरा होतो. उपचारांदरम्यान लघवीच्या प्रमाणात किती बदल झाला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक एक किंवा दोन वर्षाच्या आत एम.सी.यू (M.C.U.)ची तपासणी पुन्हा केली जाते.
व्ही.यू.आर.चा हलका त्रास होत असेल तर अँटीबायोटिक्सची आणि गंभीर त्रासात ऑपरेशनची गरज असते.
ऑपरेशन:
जेव्हा व्ही. यू. आर. अधिक तीव्र असतो आणि ज्यामुळे मूत्रवाहिनी आणि किडणी फुगलेली असते, त्यावेळी मुलांच्यातील व्यंग ठीक करण्यासाठी आणि किडणीच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन आवश्यक असते. ज्या मुलांमध्ये रोगाची तीव्रता अधिक असल्यामुळे, लघवी अधिक प्रमाणात उलट्या दिशेने जाते अशा मुलांच्यात योग्य वेळी ऑपरेशन केले नाही तर किडणी कायमची खराब होऊ शकते.
ह्या ऑपरेशनचा उद्देश मूत्रवाहिनी आणि मूत्राशय यांमधील झडपे सारखी व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणणे आणि लघवी उलट्या दिशेने मूत्रवाहिनीत जाणे थांबवणे हा असतो. हे ऑपरेशन खूपच नाजूक असते. ते पेडिअॅट्रिक सर्जन किंवा युरॉलॉजिस्टद्वारा केले जाते.
व्ही. यू. आर.वरील उपचारांत रात्रीच्या वेळी अनेक वर्षापर्यंत नियमितपणे अँटीबायोटिक्स घेणे गरजेचे असते.