Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

२२. औपचामुले निर्माण होणाच्या किडणीच्या समस्या

औषधे घेतल्यामुळे शरीरातल्या इतर अवयवांच्या तुलनेत किडणीचे नुकसान होण्याची भीती का जास्त असते?

औषधे घेतल्यामुळे किडणीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असण्याची दोन कारणे आहेत:

  1. किडणी बहुतेक औषधे शरीराच्या बाहेर टाकते. या प्रक्रियेत अनेक औषधे वा त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थांमुळे किडणीचे नुकसान होऊ शकते.
  2. हृदयातून दर मिनिटाला निघणाऱ्या रक्तापैकी १/५ भाग किडणीत जातो. शरीराची ठेवण आणि वजनानुसार पूर्ण शरीरातील सर्वात जास्त रक्त किडणीत जाते. यामुळेच किडणीचे नुकसान करू शकणारी औषधे आणि इतर पदार्थ कमी वेळात आणि अधिक प्रमाणात किडणीत पोहोचतात, ज्यामुळे किडणीचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

किडणीचे नुकसान करणारी मुख्य औषधे

१) वेदनाशामक औषधे (Pain Killer):

शरीर आणि सांध्यात होणाऱ्या कमी-अधिक वेदनांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे सध्या सर्रास केले जाते. किडणी खराब होण्याच्या प्रकारासाठी ही वेदनाशामक औषधे मोठ्या प्रमाणावर जबाबदार असतात.

वेदनाशामक औषधे काय आहेत? यात कोण-कोणत्या औषधांचा समावेश होतो?

वेदना कमी करण्यासाठी आणि ताप उतरवण्यासाठी वापरात येणाऱ्या औषधांना वेदनाशामक (Nonsteroidal anti-inflammatory drugs NSAID's) औषधे म्हणतात. या प्रकारच्या औषधात मुख्यत्वेकरून पॅरासिटेमॉल, अ‍ॅस्पिरिन, आइब्युप्रोफेन, क्रिटोप्रुफेन, डायक्लोफेनाक सोडीयम, निमेसुलाईड आदींचा समावेश होतो.

किडणी खराब होण्याचे मुख्य कारण डॉक्टरी सल्ल्याशिवाय सर्रास घेतली जाणारी वेदनाशामक औषधे आहेत.

वेदनाशामक औषधांमुळे प्रत्येक रोग्याची किडणी खराब होण्याचा धोका असतो का?

नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वसामान्य व्यक्तीने, योग्य प्रमाणात आणि योग्य काळ घेतलेल्या वेदनाशामक औषधांचा वापर पूर्णपणे सुरक्षित असतो.

वेदनाशामक औषधांनी किडणी खराब होण्याचा धोका केव्हा असतो?

  • डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय दीर्घकाळ, अती प्रमाणात औषधांचा उपयोग केल्याने किडणी खराब होण्याचा धोका अधिक असतो.
  • प्रौढ वयात किडणी फेल्युअर, मधुमेह, शरीरात पाण्याचे कमी प्रमाण अशा रोगांमध्ये वेदनाशामक औषधांचा वापर धोकादायक ठरू शकतो.

किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये कुठल्या प्रकारची वेदनाशामक औषधे वापरणे सुरक्षित असते?

अशा रोग्यांसाठी पॅरासिटेमॉल हे औषध वापरणे अधिक सुरक्षित असते.

अनेक रोग्यांना हृदयाच्या त्रासासाठी सतत अ‍ॅस्पिरिन घेण्याचा सल्ला दिला जातो? ह्या औषधाने किडणीचे नुकसान होते का?

हृदयाच्या त्रासासाठी अ‍ॅस्पिरिन नियमित पण अल्प प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे किडणीचे नुकसान होत नाही.

वेदनाशामक औषधांचा परिणाम झाल्याने खराब झालेली किडणी पुन्हा ठीक होऊ शकते का?

वेदनाशामक औषध कमी वेळासाठी वापरली जाण्याने, अचानक खराब झालेली किडणी योग्य उपचार आणि वेदनाशामक औषधे बंद केल्याने पुन्हा ठीक होऊ शकते.

आपल्या मनाप्रमाणे घेतलेली वेदनाशामक औषधे किडणीसाठी धोकादायक ठरू शकतात.

प्रौढ व्यक्तींना सांधेदुखीकरिता वेदनाशामक औषधे दीर्घकाळ (अनेक वर्षांपर्यंत) आणि नियमितपणे घ्यावी लागतात. अशा रुग्णांमध्ये किडणी हळू-हळू खराब होऊ लागते. अशी किडणी पुन्हा ठीक होऊ शकत नाही. अशा रुग्णांनी किडणी सुरक्षित राहावी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घ्यावीत.

दीर्घकाळ वेदनाशामक औषधे घेतल्यामुळे किडणीवर होणाऱ्या दुष्परिणामांचे त्वरित निदान कशा प्रकारे करता येते?

१) लघवीतून प्रथिने जात असतील तर हा किडणीवरील दुष्परिणामांचा सर्वप्रथम दिसून येणारा आणि एकमेव पुरावा असू शकतो. किडणी अधिक खराब झाली असेल तर रक्ताच्या तपासणीत क्रिएटिनिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

२) अमीनोग्लाइकोसाइड:

जेन्टामायसिन नावाचे इंजेक्शन जर दीर्घकाळ आणि मोठ्या प्रमाणात घ्यावे लागले अथवा, प्रौढ वयात किडणी कमजोर असेल आणि शरिरात पाण्याचे प्रमाण कमी असेल, तर अशा रुग्णांमध्ये वरील इंजेक्शन घेतल्याने किडणी खराब होण्याची शक्यता अधिक असते. जर हे इंजेक्शन त्वरित बंद केले गेले तर बहुतेक रुग्णांमध्ये थोड्याच काळानंतर किडणी पुन्हा पूर्णपणे काम करू लागते.

३) रेडिओकाँट्रास्ट इंजेक्शने:

प्रौढ वय, किडणी फेल्युअर, मधुमेह, शरीरात पाण्याचे कमी प्रमाण, अथवा याचबरोबर किडणीचे नुकसान करू शकणारी अन्य औषधे घेतली जात असतील, तर अशा रोग्यांमध्ये आयोडिनयुक्त इंजेक्शन देऊन एक्स-रे तपासणी केल्यास, किडणी खराब होण्याची शक्यता जास्त असते. बहुसंख्य रोग्यांच्या किडणीचे झालेले नुकसान हळूहळू ठीक होऊ शकते.

प्रौढ वय, मधुमेह, शरीरात पाण्याचे कमी प्रमाण असेल तर किडणीवर औषधांचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

४) आयुर्वेदिक औषधे:

आयुर्वेदिक औषधांचा कधी काहीही विपरीत परिणाम होत नाही, हा गैरसमज आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोगात आणलेल्या शिसे, पारा यासारख्या धातूंमुळे किडणीचे नुकसान होऊ शकते. किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे अनेक वेळा धोकादायक ठरू शकतात. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये असलेले पोटॅशियमचे अधिक प्रमाण किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी जीवघेणे ठरू शकते.

५) अन्य औषधे:

कित्येकदा किडणीला हानिकारक ठरणाऱ्या अन्य औषधांमध्ये, काही विशिष्ट अँटीबायोटिक्स आणि कर्करोग तसेच क्षयरोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचाही समावेश आहे.

आयुर्वेदिक औषधे किडणीसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत हा गैरसमज आहे.