जेव्हा दोन्ही किडण्या निकामी होतात, अशा परिस्थितीत किडणीच्या कामाच्या कृत्रिम पर्याय पद्धतीला डायलिसिस म्हणतात.
डायलिसिसचे काम काय?
डायलिसिसची मुख्य कामे खालीलप्रमाणे आहेत:
१) रक्तातील अनावश्यक उत्सर्जित पदार्थ - क्रिएटिनिन, युरिया आदी दूर करून रक्त शुद्ध करणे.
२) शरीरात जमा झालेले जास्त पाणी काढून द्रवाचा समतोल राखणे.
३) शरीरातील क्षारांचे प्रमाण (सोडियम, पोटॅशियम) योग्य ठेवणे.
४) शरीरातील आम्लाचे प्रमाण अधिक असल्यास ते कमी करून योग्य ठेवणे.
डायलिसिसची गरज केव्हा भासते?
जेव्हा किडणीची कार्यक्षमता अगदीच कमी होते किंवा किडणी पूर्णपणे काम बंद करते, तेव्हा औषधे घेऊनसुद्धा किडणी रोगाची लक्षणे (उलटी होणे, मळमळणे, उमाळे येणे, अशक्तपणा वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे) वाढू लागतात. अशा अवस्थेत डायलिसिसची आवश्यकता भासते. सामान्यतः रक्ततपासणीत जर सीरम क्रिएटिनिनचे प्रमाण ८ मि.ग्रॅ. (%) पेक्षा जास्त आढळले तर डायलिसिस करावे लागते.
डायलिसिस किडणीच्या कार्याचा कृत्रिम पर्याय आहे.
                         
                    
                       
                            
                            डायलिसिस केल्यावर किडणी पुन्हा काम करू लागते का?
नाही. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये डायलिसिस केल्यावरही किडणी पुन्हा काम करीत नाही. अशा रुग्णांमध्ये डायलिसिस हा किडणीचे काम करणारा कृत्रिम पर्याय आहे. त्यांना तब्बेत व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमितपणे कायम डायलिसिस करणे आवश्यक असते.
परंतु अक्यूट किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये थोडा काळच डायलिसिस करून घेणे गरजेचे असते. अशा रुग्णांमध्ये किडणी काही दिवसांनी पूर्ववत काम करू लागते व त्यांना नंतर डायलिसिस किंवा औषधांची गरज नसते.
डायलिसिसचे किती प्रकार आहेत?
डायलिसिसचे दोन प्रकार आहेत.
१) हीमोडायालिसिस (Hemodialysis)
अशा प्रकारच्या डायलिसिसमध्ये डायलिसिस मशीन विशेष प्रकारच्या क्षारयुक्त द्रव्यांच्या मदतीने (Dialysate) कृत्रिम किडणीत (Dialyser) रक्त शुद्ध करते.
२) पेरिटोनियल डायालिसिस (Peritonial Dialysis)
अशा प्रकारच्या डायलिसिसमध्ये पोटात एक खास प्रकारची कॅथेटर नळी (P. D. Catheter) घालून, विशेष प्रकारच्या क्षारयुक्त द्रव्यांच्या (P. D. Fluid) मदतीने शरीरात जमा झालेले अनावश्यक पदार्थ दूर करून शुद्धीकरण केले जाते. अशाप्रकारच्या डायलिसिसला मशीनची आवश्यकता नसते.
दोन्ही किडण्या खराब होऊनसुद्धा रुग्ण डायलिसिसच्या मदतीने दीर्घकाळ जगू शकतो.
                         
                    
                       
                            
                            डायलिसिसमध्ये रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे?
    - हीमोडायलिसिसमध्ये कृत्रिम किडणीचे कृत्रिम पातळ आवरण सेमीपरमिएबल मेम्ब्रेन आणि पेरिटोनीयल डायलिसिसमध्ये पोटाच्या आतील अस्तर पातळ आवरण म्हणून काम करते.
- पातळ आवरणातल्या बारीक छिद्रांमधून पाणी, क्षार आणि अनावश्यक युरिया, क्रिएटिनिनसारखे पदार्थ उत्सर्जित केले जातात. परंतु शरीराला आवश्यक असणारे रक्तकणांसारखे मोठे पदार्थ तसेच प्रोटीन्स बाहेर पडू शकत नाहीत.
- डायलिसिसच्या क्रियेत पातळ आवरणाच्या एका बाजूला डायलिसिसचा द्रव तर दुसऱ्या बाजूला शरीरातील रक्त असते.
- ऑस्मोसिस आणि डिफ्युजनच्या सिद्धांतानुसार रक्तातील अनावश्यक पदार्थ आणि अतिरिक्त पाणी, रक्तातून डायलिसिसच्या द्रवाद्वारे शरीरातून बाहेर काढले जातात. किडणी फेल्युअरच्या कारणामुळे सोडियम, पोटॅशियम आणि आम्लाच्या प्रमाणात झालेले बदल सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कामही ह्या प्रक्रियेदरम्यान होते.
कुठल्या रोग्यांसाठी हीमोडायलिसिस आणि कुठल्या रोग्यांसाठी पेरीटोनियल डायलिसिसचे उपचार केले जातात?
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या उपचारात दोन्ही प्रकारचे डायलिसिस परिणामकारक ठरतात. रोग्याला दोन्ही प्रकारच्या डायलिसिसमधून होणाऱ्या फायद्या-तोट्यांबद्दल माहिती दिल्यानंतर; रोग्याची आर्थिक स्थिती, तब्बेत, घरापासून हीमोडायलिसिस करण्याच्या ठिकाणाचे अंतर आदी बाबींवर विचार केल्यानंतर, कोणत्या प्रकारचे डायलिसिस करायचे हे ठरवले जाते. भारतात बहुतेक ठिकाणी हीमोडायलिसिस कमी खर्चात आणि सहज उपलब्ध आहे. त्यामुळे हीमोडायलिसिसद्वारे उपचार घेणाऱ्या रोग्यांची संख्या भारतात अधिक आहे.
डायलिसिस करणाऱ्या रोग्यांनाही आहारात पथ्य पाळणे गरजेचे असते.
                         
                    
                       
                            
                            डायलिसिस सुरू केल्यानंतर रोग्याला खाण्यापिण्यात पथ्य पाळणे गरजेचे असते का?
होय. डायलिसिस सुरू केल्यानंतर रोग्याला आहारात संतुलित प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ घेणे, मीठ कमी खाणे तसेच पोटॅशियम आणि फॉस्फरस वाढू न देण्याचा सल्ला दिला जातो. मात्र केवळ औषधोपचार घेणाऱ्या रोग्यांच्या तूलनेत डायलिसिस सारखा उपचार घेणाऱ्या रोग्याला खाण्यापिण्यात अधिक सूट दिली जाते. तसेच जास्त प्रथिने आणि जीवनसत्वयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
हीमोडायलिसिस (रक्ताचे डायलिसिस)
जगभरात डायलिसिस करणाऱ्या रोग्यांपैकी बहुसंख्य रोगी ह्या प्रकारचे डायलिसिस करतात.
ह्या प्रकारात हीमोडायलिसिस मशीनद्वारे रक्त शुद्ध केले जाते.
हीमोडायलिसिस कशा प्रकारे केले जाते?
    - हीमोडायलिसिस मशीनच्या आत असलेल्या पंपाच्या मदतीने शरीरातील २५० ते ३०० मिलि रक्त, दर मिनिटाला, शुद्ध करण्यासाठी कृत्रिम किडणीत पाठवले जाते. रक्तात गुठळी होऊ नये यासाठी त्यात हिपॅरीन नावाच्या औषधाचा वापर केला जातो.
- कृत्रिम किडणी, रोगी आणि डायलिसिस मशीन यांच्या मध्ये राहून रक्ताच्या शुद्धीकरणाचे काम करते. शुद्धीकरणासाठी रक्त डायलिसिस मशीनच्या आत जात नाही.
हीमोडायलिसिस ही डायलिसिस मशीनच्या मदतीने रक्त शुद्ध करण्याची एक सोपी प्रक्रिया आहे.
                         
                    
                       
                            
                            
    - कृत्रिम किडणीत रक्ताचे शुद्धीकरण डायलिसिस मशीनद्वारे पाठवण्यात आलेल्या खास प्रकारच्या द्रवाच्या (डायलायझेट) मदतीने होते.
- शुद्ध केलेले रक्त पुन्हा शरीरात पाठवले जाते.
- हीमोडायलिसिसची प्रक्रिया साधारणपणे ४ तास चालते. यात शरीरातले सर्व रक्त कमीत कमी १२ वेळा शुद्ध केले जाते.
- हीमोडायलिसिसच्या क्रियेत नेहमी रक्त देण्याची गरज पडते हा गैरसमज आहे. मात्र रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर अशा स्थितीत डॉक्टरांना आवश्यक वाटले तरच रक्त दिले जाते.
शुद्धीकरणासाठी रक्त कशाप्रकारे शरीरातून बाहेर काढले जाते?
रक्त काढण्यासाठी पुढीलप्रमाणे मुख्य पद्धतींचा उपयोग केला जातो.
१) डबल ल्युमेन कॅथेटर
२) ए.वी. फिस्च्युला
३) ग्राफ्ट

                         
                    
                       
                            
                            १) डबल ल्युमेन कॅथेटर (नळी):
    - अत्यावश्यक परिस्थितीत पहिल्यांदा तात्काळ डायलिसिस करण्याची ही सर्वाधिक प्रचलित पद्धत आहे ज्यात नसेत कॅथेटर घालून त्वरित डायलिसिस करता येऊ शकते.
- हा कॅथेटर गळ्यात, काखेत किंवा जांघेत असलेल्या मोठ्या नसेमध्ये (Internal Jagular, Subclavian or Femoral Vein) घातला जातो आणि त्याच्या मदतीने प्रत्येक मिनिटाला ३०० ते ४०० मिलि. रक्त शुद्धीकरणासाठी काढले जाते.
- हा कॅथेटर (नळी) बाहेरच्या भागात दोन हिश्श्यांमध्ये वेगवेगळ्या नळ्यांच्यात विभाजित होतो. नळीचा एक हिस्सा शरीरातून रक्त बाहेर काढण्यासाठी आणि दुसरा हिस्सा रक्त परत पाठवण्यासाठी वापरला जातो. शरीराच्या आत जाण्याच्या आधी नळीचे दोन्ही हिस्से एकत्र होतात (जे प्रत्यक्षात मात्र दोन भागांत विभागलेलेच असतात).
- कॅथेटरमध्ये संसर्ग होण्याच्या भीतीने ३ ते ६ आठवड्यांसाठी हीमोडायलिसिस करण्याकरिता, ह्या पद्धतीला पसंती दिली जाते.
 २) ए. वी. फस्च्युला
२) ए. वी. फस्च्युला
    - अनेक महिने किंवा वर्षांसाठी हीमोडायलिसिस करण्याकरता सर्वात जास्त उपयोगात आणली जाणारी ही  पद्धत सुरक्षित असल्याकारणाने अतिशय उत्तम आहे.
- ह्या पद्धतीत मनगटावरील धमनी आणि शिरा ऑपरेशनद्वारे जोडण्यात येते
- धमनी (Artery) मधून जास्त प्रमाणात दाबाबरोबर आलेले रक्त शिरेमध्ये (Vein) जाते, ज्यामुळे हातातल्या सर्व शिरा फुगतात.
- ह्याप्रकारे शिरा फुगवायला ३ ते ४ आठवड्यांचा वेळ लागतो. त्यानंतरच शिरांचा उपयोग डायलिसिससाठी करता येतो.
- यामुळेच पहिल्यांदा लगेचच डायलिसिस करण्यासाठी त्वरित फिस्च्युला बनवून त्याचा उपयोग करता येत नाही.
- फुललेल्या शिरा किंवा नसांमध्ये दोन भिन्न जागी विशेष प्रकारच्या जाड्या सुया (Fistula Needle) घातल्या जातात.
 
                    
                       
                            
                            
    - ह्या सुयांच्या मदतीने डायलिसिससाठी रक्त बाहेर काढले जाते आणि ते शुद्ध केल्यानंतर पुन्हा शरीरात घालते जाते.
- फिस्च्युलाच्या मदतीने अनेक महिने वा वर्षांपर्यंत हीमोडायलिसिस करता येते.
- फिस्च्युला केलेल्या हातांनी सर्व नैमित्तिक कामे करता येतात.
ए. वी. फिस्च्युलाची विशेष देखभाल करणे का गरजेचे असते?
    - क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या अंतिम अवस्थेतल्या उपचारात रोग्याला हीमोडायलिसिस करावे लागते. नियमित डायलिसिसवरच ह्या रोग्यांचे जीवन अवलंबून असते. ए. वी. फिस्च्युला जर योग्य पद्धतीने काम करत असेल तर यातून डायलिसिससाठी पुरेशा प्रमाणात रक्त घेतले जाऊ शकते. थोडक्यात डायलिसिस करणाऱ्या रोग्यांचे जीवन ए. वी. फिस्च्युलाच्या योग्य कार्यक्षमतेवर आधारित असते.
ए. वी. फिस्चुलाद्वारे जर नेहमीच पुरेशा प्रमाणात रक्त मिळत राहिले तरच योग्य रीतीने डायलिसिस होऊ शकते.
                         
                    
                       
                            
                            ए. वी. फिस्च्युलामुळे फुगलेल्या शिरांमध्ये अधिक दाबाबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह येतो. जर ए. वी. फिस्च्युलामध्ये अचानक जखम झाली तर फुगलेल्या नसांमधून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडण्याची शक्यता असते. अशा स्थितीत जर रक्तप्रवाहावर त्वरित नियंत्रण ठेवता आले नाही तर थोड्या वेळातच रोग्याचा मृत्यूही होऊ शकतो.
ए. वी. फिस्च्युलाचा दीर्घकाळापर्यंत संतोषजनक उपयोग करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी?
ए. वी. फिस्च्युलाच्या मदतीने अनेक वर्षांपर्यंत डायलिसिससाठी पुरेशा प्रमाणात रक्त मिळावे यासाठी, खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१) नियमित व्यायाम करणे: फिस्च्युला तयार केल्यानंतर नस फुगलेलीच राहण्यासाठी आणि त्यातून पुरेशा प्रमाणात रक्त उपलब्ध व्हावे यासाठी हाताचा नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. फिस्च्युलाच्या मदतीने हीमोडायलिसिस सुरू केल्यानंतरही हाताचा नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
२) रक्तदाब कमी झाला तर, फिस्च्युलाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे फिस्च्युला बंद होण्याची भीती असते. यामुळेच रक्तदाब कमी-जास्त होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
३) फिस्च्युला केल्यानंतर प्रत्येक रोग्याने दिवसात ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळी) फिस्च्युला योग्य रीतीने काम करत आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे. अशी काळजी बाळगल्याने फिस्च्युलाचे काम अचानक बंद पडले तर ते त्वरित ध्यानात येऊ शकते. त्वरित निदान आणि योग्य उपचारांनी फिस्च्युला पुन्हा काम करू लागतो.
हीमोडोयलिसिस करणाऱ्या रुग्णांसाठी ए. वी. फिस्च्युला जीवनदान देणारा असल्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
                         
                    
                       
                            
                            ४) फिस्च्युला केलेल्या हाताच्या शिरेत कधीही इंजेक्शन घेता कामा नये, तसेच त्या शिरेत ग्लुकोज किंवा रक्तही देता कामा नये किंवा तपासणीसाठी रक्त काढता कामा नये.
५) फिस्च्युला केलेल्या हातावर रक्तदाब मोजून पाहू नये.
६) फिस्च्युला केलेल्या हातांनी वजन उचलता कामा नये तसेच त्या हातावर जास्त भार पडणार नाही ह्याकडेही लक्ष दिले पाहिजे. विशेषतः झोपताना त्या हातावर दाब पडणार नाही, ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.
७) फिस्च्युलाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही हेही ध्यानात ठेवले पाहिजे. त्या हातात घड्याळ, दागिने (कडे किंवा धातूच्या बांगड्या); जे हातावर दाब टाकू शकतात, ते घालता कामा नये. जर कोणत्याही कारणांनी फिस्च्युलाला जखम झाली आणि रक्त वाहू लागले तर न घाबरता, दुसऱ्या हाताने मोठा दाब देऊन रक्त थांबवले पाहिजे. हीमोडायलिसिस नंतर वापरली जाणारी पट्टी आवळून बांधल्यास रक्त वाहणे थांबवता येते. त्यानंतर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. रक्त वाहणे थांबवल्याशिवाय डॉक्टरकडे जाणे जीवघेणे ठरू शकते.
८) फिस्च्युला लावलेला हात स्वच्छ ठेवला पाहिजे आणि हीमोडायलिसिस करण्यापूर्वी, हात जीवाणूनाशक साबणांनी स्वच्छ धुतला पाहिजे.
९) हीमोडायलिसिस नंतर फिस्च्युलातून रक्त वाहणे थांबवण्यासाठी हातावर खास पट्टी (Tourniquet) घट्ट बांधली जाते. जर ही पट्टी अधिक काळ बांधून ठेवली तर फिस्च्युला बंद होण्याचा धोका असतो.
हीमोडायलिसिस मशीन, कृत्रिम किडणीच्या मदतीने रक्त शुद्ध करते तसेच पाणी, क्षार आणि आम्ल यांचे प्रमाण योग्य राखते.
                         
                    
                       
                            
                            ३) ग्राफ्ट (Graft)
    - ज्या रोग्यांच्या हाताच्या नसांची स्थिती फिस्च्युलासाठी योग्य नसते, त्यांच्यात ग्राफ्टचा वापर केला जातो.
- या पद्धतीत प्लास्टिकसारख्या पदार्थापासून तयार केलेल्या विशेष प्रकारच्या कृत्रिम शिरेच्या मदतीने ऑपरेशनद्वारे हात किंवा पायातील मोठी धमनी आणि शीर जोडण्यात येते.
- फिस्च्युला च्या सुया ग्राफ्टमध्ये घालून हीमोडायलिसिससाठी रक्त काढले आणि परत पाठवले जाते.
- ही पद्धत खूप महागडी असल्याने खूप कमी रोग्यांत ह्याचा वापर केला जातो.
हीमोडायलिसिस मशीनचे कार्य काय?
हीमोडायलिसिस मशीनची मुख्य कामे पुढीलप्रमाणे:
१) हीमोडायलिसिस मशीनचा पंप रक्तशुद्ध करण्यासाठी शरीरातून रक्त घेण्याचे आणि आवश्यकतेनुसार त्याचे प्रमाण कमी वा जास्त करण्याचे काम करतो.
२) मशीन विशेष प्रकारचे द्रव (डायलायझेट) तयार करून कृत्रिम किडणीत (डायालायजर) पाठवते. डायालायझेटचे तापमान, त्यातील क्षार, बायकार्बोनेट इत्यादी योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम मशीन करते. हे डायलाजझेट योग्य प्रमाणात आणि योग्य दाबात कृत्रिम किडणीत हे मशीन पाठवते आणि रक्तातील अनावश्यक पदार्थ दूर केल्यानंतर डायालायझेटपण बाहेर टाकते.
हीमोडायलिसिसमध्ये कोणत्याही वेदना होत नाहीत आणि रोगी बिछान्यावर पडून किंवा खुर्चीत बसून नेहमीची कामे करू शकतो.
                         
                    
                       
                            
                            ३) किडणी फेल्युअरमध्ये शरीरावर सूज अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे येते. डायलिसिस क्रियेत शरीरातील अतिरिक्त पाणी मशीनद्वारे काढले जाते.
४) हीमोडायलिसिस करताना, रोग्याच्या सुरक्षेसाठी डायलिसिस मशीनमध्ये अनेक प्रकारच्या व्यवस्था केलेल्या असतात.
डायलायझर (कृत्रिम किडणी) ची रचना कशी असते?

कृत्रिम किडणी साधारणतः ८ इंच लांब आणि दीड इंच व्यासाच्या पारदर्शक प्लास्टिक पाईपची बनलेली असते, ज्यात केसाएवढ्या सूक्ष्म दहा हजार नलिका असतात. ह्या नळ्या पातळ व आतून पोकळ असतात. खास प्रकारच्या प्लास्टिकच्या पारदर्शक पातळ आवरणाने ह्या नळ्या बनलेल्या असतात. ह्या पातळ नळ्यांच्या आतून रक्त प्रवाहित होऊन शुद्ध होते.
    - कृत्रिम किडणीच्या वरच्या आणि खालच्या भागात ह्या पातळ नळ्या एकत्र होऊन एक जाड नळी बनते, ज्यात शरीरातून रक्त घेऊन येणारी व पुन्हा शरीरात रक्त घेऊन जाणाऱ्या नळ्या (Blood Tubings) जोडल्या जातात.
- कृत्रिम किडणीच्या वरच्या व खालच्या भागाच्या कडेच्या बाजूला मोठ्या नळ्या जोडलेल्या असतात, ज्यातून मशीनमधून शुद्धीकरणासाठी प्रवाहित केलेला द्रव (Dialysate) आत जाऊन पुन्हा बाहेर येतो.
 
                    
                       
                            
                            डायालायजर (कृत्रिम किडणीत) रक्ताचे शुद्धीकरण:

    - शरीरातून शुद्धीकरणासाठी येणारे रक्त कृत्रिम किडणीत एका बाजूने आत जाऊन हजारो पातळ नळ्यांत वाटले जाते. कृत्रिम किडणीच्या दुसऱ्या बाजूने दाबाबरोबर येणारे डायलायझेट द्रव रक्तशुद्धीकरणासाठी पातळ नळ्यांच्या आजूबाजूला चारही दिशांनी जाते.
- डायलायझरमध्ये रक्त वरून खाली आणि डायलायझेट द्रव खालून वर एकाच वेळी विरुद्ध दिशेने प्रवाहित होते. या क्रियेत अर्धपातळ आवरणाने (Semipermeable membrane) बनलेल्या पातळ नळ्यांमधून रक्तातील क्रिएटिनिन, युरियासारखे उत्सर्जित पदार्थ डायालायजेटमध्ये मिसळून बाहेर काढले जातात. अशाप्रकारे कृत्रिम किडणीत एका बाजूने येणारे अशुद्ध रक्त दुसऱ्या बाजूने बाहेर पडते तेव्हा ते साफ झालेले शुद्ध रक्त असते.
- डायलिसिसच्या क्रियेत शरीरातील संपूर्ण रक्त सुमारे १२ वेळा शुद्ध होते.
- चार तासांच्या डायलिसिस क्रियेनंतर रक्तातील क्रिएटिनिन आणि युरियाचे प्रमाण उल्लेखनीयरित्या कमी झाल्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते.
 
                    
                       
                            
                            हीमोडायलिसिसमध्ये ज्या विशेष प्रकारच्या द्रवामुळे रक्त शुद्ध होते, ते डायलायझेट काय आहे?
    - हीमोडायलिसिससाठी विशेष प्रकारचा अत्याधिक क्षारयुक्त द्रव (हीमोकॉन्सन्ट्रेट) १० लिटरच्या प्लास्टिक जारमध्ये मिळतो.
- हीमोडायलिसिस मशीन ह्या हिमोकॉन्सन्ट्रेटचा एक भाग आणि ३४ भाग शुद्ध पाणी मिसळून डायलायझेट बनवले जाते.
- हीमोडायलिसिस मशीन डायलायझेटमधील क्षार आणि बायकार्बोनेटचे प्रमाण शरीराला आवश्यक त्या प्रमाणात स्थिर ठेवते.
- डायलायझेट तयार करण्यासाठी वापरात येणारे पाणी, क्षाररहित, मीठ नसलेले आणि शुद्ध असते, जे विशेष प्रकारच्या RO Plant (Reverse Osmosis Plant - जलशुद्धीकरण यंत्र) च्या वापराने बनवले जाते.
- ह्या RO Plant मध्ये रेतीचा चुरा, कोळशाचा मायक्रोफिल्टर, डि-अयोनायझर, आर. ओ. मेम्ब्रेन आणि यु.व्ही. (Ultraviolet) फिल्टर असतात. त्यामुळे मीठ नसलेले, शुद्ध आणि पूर्णपणे जीवाणूरहित पाणी तयार होते.
- हीमोडायलिसिस सुरक्षित आणि परिणामकारक व्हावे यासाठी पाणी वरीलप्रमाणे शुद्ध होणे गरजेचे असते.
हीमोडायलिसिस कोठे करण्यात येते?
सामान्यपणे हीमोडायलिसिस रुग्णालयातल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांद्वारे, नेफ्रॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या देखरेखीखाली केले जाते. काही रोगी डायलिसिसचे मशीन खरेदी करून, प्रशिक्षण घेऊन कुटुंबियांच्या मदतीने घरातच हीमोडायलिसिस करतात. अशा प्रकारच्या डायलिसिसला होम हीमोडायलिसिस म्हणतात. ह्यासाठी पैसे, प्रशिक्षण आणि वेळ लागतो.
रक्ताचे शुद्धीकरण आणि अतिरिक्त पाणी दूर करण्याचे काम डायालायझरमध्ये होते.
                         
                    
                       
                            
                            हीमोडायलिसिस वेदनादायक आणि गुंतागुंतीचा उपचार आहे का?
नाही. हीमोडायलिसिस ही साधी आणि वेदनारहित क्रिया आहे. ज्या रोग्यांना दीर्घकाळासाठी डायलिसिसची गरज असते, ते फक्त हीमोडायलिसिस करण्याकरिता रुग्णालयात येतात आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच आपल्या घरी परत जातात. बहुतेक रोगी ह्या प्रक्रियेच्या चार तासांतला वेळ झोपण्यात, आराम करण्यात, टी.व्ही पाहण्यात, संगीत ऐकण्यात किंवा आपली आवडती पुस्तके वाचण्यात घालवतात. बहुतेक रोगी ह्या काळात हलका नाश्ता, चहा किंवा थंड पेय घेणे पसंत करतात.
डायलिसिसच्या दरम्यान सामान्यतः कुठला त्रास होऊ शकतो?
डायलिसिसच्या दरम्यान होणाऱ्या त्रासांमध्ये रक्तदाब कमी होणे, पाय दुखणे, अशक्तपणा जाणवणे, मळमळ, उलटीसारखे वाटणे आदींचा समावेश आहे.
हीमोडायलिसिसचे मुख्य फायदे आणि तोटे कोणते?
हीमोडायलिसिसचे मुख्य फायदे:
१) कमी खर्चात डायलिसिसचा उपचार.
२) रुग्णालयात तज्ज्ञ कर्मचारी आणि डॉक्टरांद्वारे केला जाणारा उपचार असल्याने हीमोडायलिसिस सुरक्षित आहे.
३) कमी वेळात जास्त परिणामकारक उपचार.
४) संसर्ग (Infection) होण्याची शक्यता खूप कमी असते.
५) हा उपचार दररोज करण्याची आवश्यकता नसते.
६) इतर रोगी भेटल्याने तसेच त्यांच्याशी चर्चा झाल्याने मानसिक तणाव कमी होतो.
हीमोडायलिसिस सोपा, वेदनारहित आणि परिणामकारक उपचार आहे.
                         
                    
                       
                            
                            हीमोडायलिसिसचे मुख्य तोटे.
१) ही सोय प्रत्येक गावांत किंवा शहरात उपलब्ध नसल्याने वारंवार दुसरीकडे जाण्याचे कष्ट घ्यावे लागतात.
२) उपचारासाठी रुग्णालयात जाणे आणि वेळेच्या मर्यादेचे पालन करावे लागते.
३) प्रत्येक वेळी फिस्च्युला सुई लावणे वेदनादायी असते.
४) हॅपेटायटीसचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
५) हीमोडायलिसिस युनिट सुरू करणे प्रचंड खर्चिक असते आणि ते चालवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची गरज असते.
हीमोडायलिसिसच्या रोग्यांसाठी आवश्यक सूचना:
१) दीर्घकाळासाठी निरोगी आयुष्य जगण्याकरिता नियमित हीमोडायलिसिस करणे गरजेचे आहे. यात अनियमितता येणे वा बदल करणे शरीरासाठी हानिकारक आहे.
२) दोन डायलिसिसच्या मधल्या काळात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यात पथ्य (कमी पाणी आणि मीठ) पाळणे गरजेचे आहे.
३) हीमोडायलिसिसच्या उपचाराबरोबरच रोग्याने नियमित औषधे घेणे तसेच रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
हीमोडायलिसिसचा मुख्य फायदा ते सुरक्षित, जास्त परिणामकारक आणि कमी खर्चिक आहे.
                         
                    
                       
                            
                            पेरीटोनियल डायलिसिस (पोटाचे डायलिसिस)
किडणी फेल्युअरच्या रोग्यांना जेव्हा डायलिसिसची गरज भासते तेव्हा पेरीटोनियल डायलिसिस हा दुसरा पर्यायही असतो.
पेरीटोनिअल डायलिसिस (P.D.) काय असते?
पोटाच्या आतील आतडी आणि इतर अवयवांना त्यांच्या स्थानावर पकडून ठेवणाऱ्या पातळ आवरणाला पेरीटोनियल म्हटले जाते.
    - हे आवरण सेमी-परमीएबल म्हणजे चाळणीसारखे असते.
- ह्या आवरणाच्या मदतीने होणाऱ्या रक्त शुद्धीकरण प्रक्रियेला पेरीटोनियल डायलिसिस म्हणतात.
ह्यापुढील चर्चेत आपण पेरीटोनियल डायलिसिसला पी.डी. हे संक्षिप्त नाव वापरू.
पेरीटोनियल डायलिसिस (PD) चे किती प्रकार असतात?
१) आय.पी.डी. - इन्टरमिटन्ट पेरीटोनियल डायलिसिस (Intermittent Peritoneal Dialysis)
२) सी.ए.पी.डी. - कन्टीन्युअस एम्बुलेटरी पेरीटोनिअल डायलिसिस (Continuous Ambulatory Peritoneal Dialysis)
३) सी.सी.पी.डी. - कन्टीन्युअस सायक्लिक पेरीटोनिअल डायलिसिस - (Continuous Cyclic Peritoneal Dialysis)
CAPD हे रोग्याद्वारा घरच्या घरी, मशीनशिवाय खास प्रकारच्या द्रव्याच्या मदतीने केले जाणारे डायलिसिस आहे.
                         
                    
                       
                            
                            
इन्टरमिटन्ट पेरीटोनियल डायलिसिस (आय.पी.डी.)
रुग्णालयात भरती झालेल्या रोग्याला जेव्हा कमी काळासाठी डायलिसिसची गरज असते तेव्हा ह्या प्रकारचे डायलिसिस केले जाते.
आय.पी.डी. मध्ये रोग्याला बेशुद्ध न करता बेंबीखालील पोटाचा भाग विशेष औषधाने बधिर केला जातो. या जागेतून अनेक छिद्रे असलेली एक मोठी ……………………………………………………………………… (Peritonial Dialysis Fluid) मदतीने रक्तातील कचरा (अशुद्ध द्रव्ये) वेगळा केला जातो.
    - सामान्यपणे डायलिसिसची ही प्रक्रिया ३६ तासांपर्यंत चालते. ह्या दरम्यान ३० ते ४० लिटर द्रवाचा उपयोग शुद्धीकरणासाठी केला जातो.
- ह्या प्रकारचे डायलिसिस दर ३ ते ५ दिवसांनी करावे लागते.
- ह्या डायलिसिसमध्ये रोग्याला कुशीवर न वळता पाठीवर झोपावे लागते त्यामुळे हे डायलिसिस दीर्घ काळासाठी योग्य नाही.
 
                    
                       
                            
                            2) कन्टीन्युअस एम्बुलेटरी पेरीटोनियल डायलिसिस (सी.ए.पी.डी.)
सी.ए.पी.डी. चा अर्थ:
सी - कंटीन्युअस - ह्यात डायलिसिसची क्रिया निरंतर चालू असते.
ए - एम्बुलेटरी - ह्या क्रियेदरम्यान रोगी चालू, फिरू शकतो आणि सर्वसाधारण कामही करू शकतो.
पी.डी. - पेरीटोनियल डायलिसिसची - ही प्रक्रिया आहे.
सी.ए.पी.डी. मध्ये रोगी आपल्या घरीच राहून स्वतः मशीनशिवाय डायलिसिस करू शकतो. जगातल्या विकसित देशांमध्ये क्रॉनिक किडणी फेल्युअरचे रोगी जास्त करून ह्याच डायलिसिसचा उपयोग करतात.
सी.ए.पी.डी. ची प्रक्रिया:
    - ह्या प्रकारच्या डायलिसिसमध्ये अनेक छिद्रे असलेली नळी (CAPD Catheter) बेंबीखाली छोटीशी चीर पाडून पोटात घातली जाते.
- ही नळी सिलिकॉनसारख्या विशेष पदार्थांनी बनवलेली असते. ती मऊ आणि लवचिक असून पोट किंवा आतील भागांना नुकसान न पोहोचता पोटात आरामात राहते.
- हा नळीद्वारे दिवसात ३ ते ४ वेळा दोन लिटर डायलिसिस द्रव पोटात टाकला जातो आणि विशिष्ट तासानंतर हा द्रव बाहेर काढला जातो.
- पी.डी.चा द्रव जेवढा वेळ पोटात असतो त्याला ड्वेल टाईम (Dwell time) म्हणतात. ह्या क्रियेदरम्यान रक्तातील कचरा डायलिसिसच्या द्रवात गाळला जातो आणि रक्ताचे शुद्धीकरण होते.
- डायलिसिससाठी प्लॅस्टिकच्या मऊ पिशवीत ठेवलेले २ लिटर द्रव पोटात घातल्यानंतर रिकामी पिशवी कमरेला पट्टयाने बांधून आरामात चालता-फिरता येते.
- ही डायलिसिस क्रिया पूर्ण दिवसभर चालते आणि दिवसात ३ ते ४ वेळा द्रव बदलले जाते. पी.डी. द्रव बदलण्याच्या व्यतिरिक्त उर्वरित वेळेत रोगी चालू, फिरू शकतो. तसेच छोटी मोठी कामे किंवा नोकरीही करू शकतो.
सी.ए.पी.डी.च्या रोग्याने जास्त प्रथिनयुक्त आहार घेणे गरजेचे आहे.
                         
                    
                       
                            
                            सी.ए.पी.डी. च्या रोग्याला आहारात कोणते परिवर्तन करायचा सल्ला दिला जातो?
सी.ए.पी.डी. च्या ह्या क्रियेत पोटातून बाहेर निघणाऱ्या द्रवाबरोबर शरीरातून प्रथिनेही बाहेर पडतात. त्यामुळे, निरोगी राहण्यासाठी जास्त प्रथिनयुक्त आहार नियमितपणे घेणे अत्यावश्यक आहे.
रोगी किती मीठ, पोटॅशियमयुक्त पदार्थ किंवा पाणी घेऊ शकतो याचे प्रमाण डॉक्टर रक्तदाब, शरीरावरील सुजेचे प्रमाण आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांचा अहवाल बघून सांगतात.
सी.ए.पी.डी. उपचाराच्या रोग्यांना संभवणारे मुख्य धोके कोणते?
    - सी.ए.पी.डी. च्या मुख्य धोक्यात पेरीटोनायटिस (पोटात सूज येणे), कॅथेटर जेथून बाहेर येतो तेथे संसर्ग होणे (Exit Site Infection), जुलाब होणे आदी आहेत.
- सी.ए.पी.डी. च्या रोग्यांना सर्वात जास्त धोका पेरिटोनायटिसचा आहे. जो पेरीटानियममध्ये झालेला संसर्ग असतो.
- पोटदुखी, ताप येणे आणि पोटातून बाहेर येणाऱ्या द्रवात जर घाण दिसली तर ही पेरीटोनायटिसची लक्षणे आहेत.
सी.ए.पी.डी. च्या प्रक्रियेत संसर्ग होऊ नये याची सर्वात महत्त्वाची खबरदारी घ्यावयाची असते.
                         
                    
                       
                            
                            सी.ए.पी.डी. चे मुख्य फायदे आणि तोटे कोणते?
सी.ए.पी.डी. चे मुख्य फायदे:
१) डायलिसिससाठी रोग्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागत नाही. रोगी स्वतःच घरच्या घरी हे डायलिसिस करू शकतो.
२) स्थळ आणि काळाचा त्रास होत नाही. रोगी दैनंदिन काम करू शकतो आणि घराच्या बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणीही जाऊ शकतो.
३) खाण्यापिण्यात कमी पथ्य पाळावे लागते.
४) ही क्रिया मशीनशिवाय होते. इंजेक्शनच्या त्रासापासून रोग्याची सुटका होते.
५) उच्च रक्तदाब, सूज, रक्ताल्पता आदींवर उपचार सुलभपणे करता येतात.
सी.ए.पी.डी. चे मुख्य तोटे:
१) सध्या हा इलाज खूप महाग आहे.
२) यात पेरीटोनायटिस होण्याचा धोका असतो.
३) प्रत्येक दिवशी न चुकता ३ ते ४ वेळा काळजीपूर्वक द्रव बदलावे लागते. रोग्याच्या कुटुंबावर ह्याची जबाबदारी असते. अशाप्रकारे प्रत्येक दिवशी योग्य वेळी काळजीपूर्वक सी.ए.पी.डी. करणे, मानसिक तणाव निर्माण करू शकते.
४) पोटात कॅथेटर आणि द्रव कायम राहणे ही नेहमीची समस्या होते.
५) सी.ए.पी.डी. साठी लागणाऱ्या द्रवाची जड पिशवी सांभाळणे व त्यासोबत फिरणे सहज सोपे नसते.
स्थळ आणि काळापासून वेळेचे स्वातंत्र्य हा सी.ए.पी.डी. चा मुख्य फायदा आहे.