वैद्यकीय शब्दावली आणि संक्षिप्त शब्दांची माहिती
- एनीमिया (Anemia): रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे थकवा येणे, थोडेसे काम केल्यावरही थकवा येणे, श्वास लागणे इत्यादी त्रास दिसून येतात.
- एरिथ्रोप्रोएटिन (Erythropoietin): एरिथ्रोप्रोएटिन रक्तकण निर्माण होण्यासाठी लागणारा एक आवश्यक घटक आहे. हा घटक किडणीत तयार होतो. किडणी फेल्युअरच्या रुग्णात एरिथ्रोप्रोएटिनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अस्थिमज्जेतील (Bone Marrow) रक्तकणांची निर्मिती कमी होऊ लागते. त्यामुळे एनीमिया (रक्ताल्पता) होतो.
- ए. वी. फिस्च्युला (Arterio Venous Fistula): शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम रूपात धमनी आणि शीर जोडणे, धमनीतून जास्त दाबाने रक्त आल्यामुळे काही आठवड्यानंतर शीर फुगते आणि त्यातून वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढते या फुगलेल्या नसेत विशेष प्रकारची जाड सुई घालून हिमोडायलिसिससाठी रक्त घेतले जाते.
- ब्लड प्रेशर (Blood Pressure): रक्तदाब.
- बी.पी.एच. BPH (Benign Prostatic Hypertrophy): प्रौढ वयाच्या पुरुषांच्यात प्रोस्टेटचा आकार वाढल्यामुळे लघवी करायला त्रास होतो.
- कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण (Cadever Kidney Transplantation): 'मेंदू मृत' किंवा 'ब्रेन डेथ' झालेल्या व्यक्तीच्या किडण्या काढून क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे बसवल्या जातात.
- कॅल्शियम (Calcium): शरीरातली हाडे, स्नायू आणि ज्ञानतंतूंच्या आरोग्यासाठी आणि त्यांचे कार्य योग्य व्हावे म्हणून आवश्यक खनिजतत्त्व, दूध आणि दुग्धजन्य पदार्थापासून मिळतात.
- क्रिएटिनिन आणि युरिया (Creatinine of Urea): क्रिएटिनिन आणि युरिया हे शरीरामध्ये नायट्रोजन मेटाबॉलिझमद्वारे निर्माण होणारे अनावश्यक घटक आहेत, जे किडणीद्वारे बाहेर फेकले जातात. सामान्यपणे रक्तात क्रिएटिनिनचे प्रमाण ०.८ ते १.४ मि.ग्रॅ तर युरियाचे प्रमाण २० ते ४० मिलिग्रॅम टक्के असते. किडणी फेल्युअरमध्ये या प्रमाणात वाढ झालेली दिसते. किडणी फेल्युअरचे निदान आणि उपचारात या दोन्हींची चाचणी महत्त्वपूर्ण असते.